AHMEDNAGAR DISTRICT SECONDARY TEACHER'S CO.OP. CREDIT SOCIETY LTD., AHMEDNAGAR

sona_small.jpg

श्री. इथापे स्वप्निल बाबुराव
सेक्रेटरी


       संस्थेच्या आजवरच्या वार्षिक अहवालाकडे पाहिल्यास संस्थेला बरेच आर्थिक स्थैर्य आले आहे, हे कोणीही नाकारु शकणार नाही. अशावेळी संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षाकडे वाटचालीचे   औचित्य साधून  सभासदांना आपल्या संस्थेचा गतेतिहास आठवणे आपण कोणत्या अडचणीतून मार्ग काढला याची स्मृती होणे साहाजिक आहे. एक उदात्त सर्वसामान्य हेतू पुढे ठेवून आणि सामुहिक हित जोपासणे तसेच कोणतेही महत्वपूर्ण काम एक रचना असते, उभारणी असते, त्यामागे काही विचार, योजना असते. त्याचे असे काही मोल असते हे जाणून समर्पीत वृत्तीने तडीस नेल्यास सामान्य माणसेही असामान्य कतृत्वाची किमया रचनात्मक कार्यातून दाखवू शकतात, हेच या सोसायटीच्या इतिहासात डोकावतांना दिसुन येते.

  

 

    स्थापनेचा उद्देश:

     स्वातंत्र्यपूर्व काळात दुसरे जागतिक महायुद्ध चालू असलेल्या परिस्थितीत महागाई बरीच झाली असता व शिक्षकांना त्यावेळी महागाई भत्ता मिळत नसल्याने व तसेच दरमहा वेतन होईलच याची हमी नसल्याने मध्यमवर्गाला आर्थिक अडचणी भासू लागल्या. या अडचणी कशा कमी करता येतील याचा विचार माध्यमिक शिक्षक करु लागले. त्यावेळी अ.नगर डिस्ट्रीक्ट सेकंडरी टिचर्स असोसिएशन या संघटनेने १९४३ साली हा प्रश्न हाताशी घेतल्यामुळे ही संस्था अस्तित्वात आली.

        सोसायटीची नोंदणी रजिस्टर नं. ८६५५/७/१/४४ आहे. सोसायटी रजिस्टर झाल्यानंतर पहिली सभा ता. १०/२/१९४४ रोजी श्री. दादासाहेब धनेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. संस्था स्थापन होताच सचिव म्हणून श्री. शं. ना. सभारंजक यांना नेमले गेले. युद्धजन्य परिस्थितीत केवळ कर्ज देण्याचे घेण्याचे व्यवहार करूनच संस्था थांबली नाही तर काही सामाजिक कार्यही संस्थेने करण्याचा प्रयत्न केला. त्या दृष्टीने जनतेच्या सोईसाठी सरकारने हाती घेतलेल्या अन्न-धान्य वाटप व कापड वाटप या बाबतीतही योजना यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपल्याही सोसायटीने हातभार लावला व जनसेवा करावी असे ठरवून आपल्या संस्थेने हे दोन्हीही कार्ये हाती घेतली.

    सोसायटी स्थापन होताना सभासद संख्या ५६ इतकी होती. सोसायटीचा अहवाल १९५०-५१ साली म्हणजे आठवा अहवाल प्रथमच छापण्यात आला. त्यावेळी सभासद संख्या ९९ होती (जुन १९५१ अखेर) या वर्षात ६२ सभासदांना २२५८८-१०-० रु. इतके कर्ज देण्यात आले होते व हे कर्जवाटप गेल्या वर्षीच्या दिडपट आहे असा उल्लेख आहे. त्यावेळी सेंट्रल बॅंकेने म्हणजे आजची अर्बन बॅंकेने संस्थेस ३०००० रू. कॅश क्रेडीट ४.५ टक्के व्याजाने मंजूर केले होते. संस्थेचे १९६९-७० पर्यंतचे अहवाल पाहिले तर प्रत्येक सर्वसाधारण सभेच्या नोटीसीमध्ये मा. अध्यक्षाची निवड करणे, कार्यकारी मंडळाची निवड करणे, धान्य समितीची निवड करणे हे विषय असत. म्हणजे प्रत्येक वर्षी कार्यकारी मंडळाची निवड ही जनरल मिटींगमध्येच होत असे व तेही अर्थातच बिनविरोध. वर्ष ७०-७१ अहवालामध्ये हे निवडीचे विषय नाहीत म्हणजे सोसायटीची पहिली  सभासदांमधून कार्यकारी मंडळाची व अध्यक्षाची निवड याचवर्षी मतदान पद्धतीने झाली.

     संस्थेच्या बावीसाव्या अहवालात सन १९६४-६५ पासुन अहवालाच्या मुखपृष्ठावर माध्यमिक शिक्षक भवनाचे रेखाचित्र व मोनोग्राम दिसून येतो. शिवाय १९६४-६५  च्या अहवालात सोसायटीच्या तळमजल्याचे बांधकाम चालू असतानाचा फोटोही आहे. जुन १९६७ अखेर बांधकामाचा तळमजल्याचा एकूण खर्च ५६१७२.४० रू. व प्लॉटसह एकूण खर्च रु. ६४१३९.४३ इतका दाखविला आहे. माध्यमिक शिक्षक सोसायटीस असणारी जागा ही ४००० स्क्वेअर फुट असून ती २ रू. स्क्वेअर फुट याप्रमाणे खरेदी केलेली आहे. जागेसाठी लागणारे रू.८०००/- ही रक्कम देणगीदारांकडून देणग्या गोळा करून शिवाय स. चि. वाळींबे यांनी राष्ट्रीय पुरस्काराचे ५००/- रू., मामा हातवळणे यांनी राज्यपुरस्काराची निम्मी रक्कम रू.२५०/- व दत्तोपंत डावरे यांची राज्यपुरस्काराची रू.२५०/- तसेच रू.६००/- श्री. मोहीले, एज्युकेशन इन्स्पेक्टर, अ.नगर यांनी मिळवून दिले.

       आजचे सोसायटीचे ऑफीस म्हणजे तळमजला १९६६ पासून वापर सुरू झाला. तळ मजल्याच्या उद्घाटनासाठी त्यावेळचे शिक्षणमंत्री मा. मधुकरराव चौधरी आले होते. तळमजल्याचे काम झाल्यानंतर मा. शंकरराव काळे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतांना त्यांनी त्यावेळी रू.५०००/-   अनूदान दिले होते.

 

सोसायटीमध्ये प्रथम फोन १९६७ मध्ये आला व त्याचा नंबर ३३१  होता.

 

      माध्यमिक शिक्षक भवनाच्या पहिल्या मजल्याचे काम म्हणजे भव्य सभागृह हे रा. मो. शिंदे असताना व रा. ह. शिंदे चेअरमन असताना झाले. दि. १२ ऑक्टो. १९७५ रोजी त्यावेळचे मुख्यमंत्री मा. ना. शंकरराव चव्हाण, प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या कार्यक्रमास त्यावेळचे आमदार कि. बा. म्हस्के, आमदार आबासाहेब निंबाळकर, नगराध्यक्ष नवनीतभाई बार्शीकर, जि. प. अध्यक्ष रामनाथजी वाघ उपस्थित होते. या हॉलचा आकार ४० बाय ४६ असून तो बांधण्यास सुमारे रू. १ लाख खर्च झालेला आहे. १९७७-७८ पर्यंत नगर डिस्ट्रीक्ट अर्बन सेंट्रल को. ऑप. बँकेचे कॅश क्रेडिट असे पण १९७८-७९ पासुन अ.नगर जिल्हा सहकारी बॅंकेकडून कॅश क्रेडिट घेणे सुरू झाले. ७८-७९ सालात कॅश क्रेडिट होते रू. २५ लाख, आज ते रू.२५० कोटी आहे. सन १९८५ पूर्बी मयत सभासदाचे कर्ज त्याच्या वारसाने फेडावे लागत असे. वारसाने मुदतीत कर्ज फेडले तर त्यावर व्याज आकारत नसत. १९८५ नंतर मयत सभासदाचे कर्ज त्याच्या ठेवी व शेअर्स वर्ग करून उरलेले कर्ज माफ करणे सुरू झाले व त्यासाठी सभासदाकडून वर्षाकाठी रू.१०/- मयत सभासद निधी घेतले जात असत. त्यावेळी कर्ज मर्यादा रू. १५०००/- होते. सन १९९२ ते १९९८ मध्ये संस्थेच्या झालेल्या निवडणूकीचा वाद न्यायालयात गेल्याने संस्थेवर ९२-९८ या काळात प्रशासकीय मंडळ राहिले. सन १९९८ साली प्रा. भाऊसाहेब कचरे यांनी संचालक मंडळाचा कालावधी संपल्याचे मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ  यांच्या निदर्शनास आणुन देऊन निवडणूक प्रक्रिया राबविली. त्यावेळी सहकार मंडळ व प्रगत मंडळ या पारंपारीक विरोधकामध्ये निवडणूक होऊन सहकार मंडळाचे १३ व प्रगत मंडळाचे ३ संचालक निवडून आले. सन २००६ मध्ये प्रा. भाऊसाहेब कचरे यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी सहकार मंडळाची एकहाती सत्ता असल्याने त्यांनी मयत सभासदाचे संपूर्ण कर्ज माफ करून त्यांच्या ठेवी व शेअर्स वारसास देणे सुरू केले.

      तसेच इतर नागरी व राष्ट्रीयकृत बॅंका सभासदांना संस्थेचय कर्जावरील व्याजदरापेक्षा कमी दराने व संस्थेपेक्षा खुप जास्त कर्ज सभासदांना सहजासहजी देऊ लागल्याने कित्येक सभासदांनी संस्थेतून सभासदत्व कमी करून अशा वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणे सुरू केले. त्याला म्हणून पुरोगामी मंडळाने सेवानिवृत्तांना कृतज्ञता निधी सुरू केला तसेच कर्जावरी व्याजदर ही २००७ पासून १० टक्के केले व कालांतराने हा व्याजदर वित्तीय संस्थांपेक्षा कमी ठरल्याने परत सभासदत्व मिळण्यासाठी धडपड सुरू झाली.

      संस्थेने सभासदांच्या मुलीच्या विवाहासाठी कन्यादान योजना सन २०१२ मध्ये सुरू करून आज संस्थेच्या सभासदाच्या मुलीसाठी रू.१००००/- देऊ लागली. यातून स्त्री जन्माचे स्वागत करणे या उपक्रमात सहभागी होण्याची संधी सर्व सभासदांनी मिळाली. आज संस्थेचे कर्जवाटप ५६३ कोटी पर्यंत पोहचले असून एका सभासदाला संस्था रू. १० लाख २३ हजार कर्ज देते व एखादा सभासद मयत झाल्यावर सर्व कर्ज माफ होतेच व त्या सभसदाच्या वारसास ठेवी व भागभांडवल परत दिले जाते व त्यासाठी प्रत्येक सभासदांकडून दरमहा रू.१२५/- आकारले जाते.

        प्रा. भाऊसाहेब कचरे यांच्या नेतृत्वामुळे लहान लहान संस्थांच्या सभासदांना या संस्थेचे संचालक होण्याची संधी मिळाली. सर्व सभासदांना ही संस्था आपली वाटायला लागली. या सोसायटीमुळे सभासदांच्या आर्थिक गरजा, त्यांच्या मुलांचे शिक्षण, विवाह, जागेची खरेदी, आजारपण यासाठी उपयोग झाला. कमीत कमी वेळेत सभासदांना कर्ज मिळाले.

        सोसायटीची सुरूवात व ७४ वर्षातील भरभराट पाहता सोसायटीची ही खरोखरच प्रगतीकडे वाटचाल चालू आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. प्रा. भाऊसाहेब कचरे यांच्या पारदर्शी, पथदशी, सर्वस्पर्शी नेतृत्वामुळे ही संस्था महाराष्ट्रात एक अग्रेसर संस्था म्हणून गणली जाते.

 

 

 

 



 

 

Head Office -
Madhyamik Shikshak Bhavan, Juna Mangalwar Bajar,
Ahmednagar. Ph.- 0241-2345331, 9922431582